मोठी बातमी: कोंढवा हादरले! खडी मशीन चौकात भर दुपारी गोळीबार; गॅंगस्टर समीर काळेच्या भावाची गोळ्या झाडून हत्या

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात शनिवारी भर दुपारी भारत पेट्रोलियम पंपासमोर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका कुख्यात गुंडाचा भाऊ गणेश काळे (वय ३६, रा. येवलेवाडी) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडामुळे कोंढवा परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे (वय अंदाजे ३५-३६) हा रिक्षातून खडीमशीन येथून येवलेवाडीकडे जात असताना, भर पावसात दुपारी अज्ञात चार इसमांनी दुचाकीवरून येऊन त्याच्यावर हल्ला केला.

हल्लेखोरांनी गणेश काळे याच्यावर सलग सहा गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार केल्याचीही माहिती आहे. खुन झालेला गणेश काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे (दत्ता काळे) याचा सख्खा भाऊ आहे. समीर काळे हा सोमा गायकवाड टोळीचा सदस्य असून सध्या कारागृहात आहे. काही महिन्यांपूर्वी वनराज आंदेकर याची दिवसाढवळ्या हत्या झाली होती. त्यानंतर गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याचाही गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीशी संबंधित होता. आंदेकर टोळीच्या सूडाच्या राजकारणातून (गॅंगवॉर) ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. वनराज आंदेकरच्या हत्येचा सूत्रधार सोमनाथ गायकवाड आणि त्याचा साथीदार समीर काळे यांच्यावर आंदेकर टोळीचे बारीक लक्ष होते.

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह कोंढवा पोलीस स्टेशनचे सर्व वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकल्यामुळे पुणे पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Related Posts

ब्रेकिंग न्यूज: बाणेरमध्ये दिवसाढवळ्या राडा! सुतारवाडीत चार अज्ञात चोरट्यांनी तरुणाला लुटले; ₹४० हजारांची रोकड लंपास

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात भरदिवसा प्रवाशांना लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे पोलिसांच्या बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका २६ वर्षीय तरुणाला चार…

ब्रेकिंग न्यूज: मार्केट यार्डात खळबळ! किरकोळ वादातून २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; एकाला अटक, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहरात किरकोळ वादातून टोकाचे पाऊल उचलून हत्या करण्याच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिबवेवाडी-कोंढवा रोडवर एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *